चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजविणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भद्रावती वनविभागाने परिसरात पिंजरा आणि कॅमेरे बसवून सातत्याने गस्त सुरू ठेवली होती. नियोजनबद्ध मोहिमेद्वारे अखेर बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात वनविभागाला यश आले.
जेरबंद झालेला बिबट्या पाहण्यासाठी गौतम नगर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीमुळे काही काळ बिबट्या अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. मात्र, वनविभागाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले. वनविभागाने बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचारांसाठी सुरक्षित ताब्यात ठेवले असून, त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
