चंद्रपूर, दि. 8 : जिल्हा क्रीडा संकूल येथे कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी कबड्डीप्रेमी, क्रीडाप्रेमी, युवक-युवती, कबड्डीपटू, जिल्हा क्रीडा संकुलातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. पुंड यांनी कबड्डीच्या वैभवशाली परंपरेचा गौरव करत नव्या पिढीने या मातीतल्या खेळाकडे आवर्जून वळावे, असे आवाहन केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात कबड्डी हा केवळ एक खेळ नसून शिस्त, संयम, परिश्रम, चपळता आणि संघभावना यांची जीवनशाळा असल्याचे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्यात प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक प्रतीक पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या केंद्रातून भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले कबड्डीपटू घडतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेमुळे परिसरातील होतकरू खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि स्पर्धात्मक तयारीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
