देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील सेवाभावी उपक्रमांचे विशेष अल्बम मुख्यमंर्त्यांना सुपुर्द

आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरे, ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या तसेच ५६ ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरांच्या आठवणींचा विशेष अल्बम तयार करण्यात आला आहे. हा अल्बम आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत त्यांना सन्मानपूर्वक सुपुर्द केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगर सेवक संजय कंचर्लावार आणि भालचंद्र दाणव यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या सेवा सप्ताहांतर्गत विविध समाजोपयोगी आणि जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते भव्य रक्तदान अभियानाचे. चंद्रपूर शहरात तब्बल ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणारे कार्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनसेवा, विकास आणि समाजहिताच्या विचारांनी प्रेरित होऊन राबविण्यात आलेल्या या अभियानाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा चंद्रपूरच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविणारा ठरला.
यावेळी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहितीही मुख्यमंर्त्यांना देण्यात आली. समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून जनसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातून आणि प्रेरणेतून जनसेवेचे विविध उपक्रम चंद्रपूरमध्ये सातत्याने राबविले जात असून, समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचा आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रयत्न आहे. ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहा’ला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद हा या जनसेवेवरील जनविश्वास वढविणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *