मालेगावच्या आक्रोश मोर्चात उसळला जनसागर ,आंदोलकांचा न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न

मालेगाव, दि. २१:मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचा निषेध तसेच मारेकऱ्यास तात्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी मालेगाव शहर व तालुका भागात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
तसेच येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त आंदोलन बिथरल्याचे बघावयास मिळाले. त्यातून त्यांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्याचा प्रकार मालेगावपासून ३० किलोमीटर अंतरावरील डोंगराळे गावात गेल्या रविवारी रात्री उघडकीस आला. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी विजय खैरनार (२४) या संशयीताला पोलिसांनी लगेच अटक केली.न्यायालयाने सुरुवातीला त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. या कोठडीची मुदत संपल्यावर गुरुवारी त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.

परंतु न्यायालय परिसरात जमलेल्या संतप्त जमावाचा अवतार बघता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाल्याने पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायालयापुढे सादर केले. न्यायालयाने सात दिवसांसाठी त्याच्या पोलीस कोठडीची

मुदत वाढवून दिली आहे. मृत चिमुकलीला श्रद्धांजली आणि संशयीताला तात्काळ फासावर लटकवावे, या मागणीसाठी शुक्रवारी मालेगाव शहर व तालुका भागात उत्स्फूर्तपणे बंदचे आयोजन करण्यात आले. शहरातील हिंदू-मुस्लिम अशा सर्वच भागात अभूतपूर्व व कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

या संदर्भात येथील रामसेतू पुलापासून अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

शहरसह ग्रामीण भागातील महिला-पुरुषांची व विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर मोर्चात सामील झाले. या मोर्चातील उपस्थितीमुळे रस्त्यावर जनसागर उसळल्याचे चित्र दिसत होते. ‘न्याय द्या-न्याय द्या’, ‘चिमुकलीला न्याय द्या’ तसेच ‘नराधमाला तात्काळ फाशी द्या’, अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *