बाबा आढाव अनंतात विलीन

वृत्तसंस्था, पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शैला आढाव, असीम आढाव, अंबर आढाव, माजी आमदार उल्हास पवार, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, अंकुश काकडे, सुभाष अंधारे, डॉ. अभिजीत वैद्य, बी.जी. कोळसे पाटील, नितीन पवार उपस्थित होते.

समता-बंधुतेचा जागर करणारे, घरोघरी संविधान पोहोचवण्याचा संकल्प केलेले, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव (वय ९५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

डॉ. अभिजीत वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितले की, एखाद्या वृक्षाच्या फांद्यांवर अनेक पारंब्या आधार घेत आम्ही आतापर्यंत काम करत आलो आहोत. आमचा वटवृक्ष आज उन्मूळून पडला आहे.

बाबांचे पुत्र असीम आढाव म्हणाले, त्यांच्या कामाचा व्याप मोठा होता; ते खरे लोकांचे महात्मा होते. शेवटपर्यंत त्यांनी असंघटित कामगार आणि वंचित घटकांसाठी आपले कार्य वाहिले. फुले यांच्या विचाराने आयुष्यभर बाबा जगले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, वंचित आणि उपेक्षित लोकांसाठी बाबांनी आपले आयुष्य समर्पित केले. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कामगार संघटना या माध्यमातून त्यांनी सातत्याने काम केले. फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी नेहमी अमलात आणली. संघर्ष युद्धोग्रामप्रमाने त्यांनी आयुष्यभर काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *