राज्यातील महापालिका निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला!

मुंबई, दि. १५ प्रतिनिधी:राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका मागील ५ ते ७ वर्षांपासून किंवा त्याहून अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार:

२३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल.

त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल.

२ जानेवारी २०२६ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल.

त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.

२९ महापालिकांमध्ये २८६९ जागा

आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह २९ महापालिकांतील २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात १४४२ महिला उमेदवार आहेत. यात अनुसूचित जातीच्या ३४१, एसटीच्या ७७ व नागरिकांच्या मागास वर्गातील ७५९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

१ जुलै २०२५ ची मतदार यादी

या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दोनदा नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दोनदा मतदार असलेल्यांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत १०,१११ मतदान केंद्रे असतील, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *