नागपूर: NEET UG पुनर्परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी एक मोठी तांत्रिक त्रुटी समोर आली आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबी येथील परीक्षा केंद्राचा उल्लेख करण्यात आला. या घटनेमुळे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील अब्दुल्ला मोहम्मद तालीब याने अर्ज प्रक्रियेदरम्यान भारतातीलच परीक्षा केंद्राची निवड केली होती. मात्र, NEET UG पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये अबू धाबी येथील परीक्षा केंद्र दर्शविण्यात आले.
या प्रकरणाची गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्याकडे परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेला पासपोर्टही उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्यासाठी अबू धाबी येथे जाऊन परीक्षा देणे अशक्य होते. प्रवेशपत्रावरील ही माहिती पाहून कुटुंबीयही आश्चर्यचकित झाले.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. चौकशीदरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य केले. तसेच लवकरच सुधारित प्रवेशपत्र जारी करून योग्य परीक्षा केंद्राची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
ई-मेलद्वारे दिले आश्वासन
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, NTA ने ई-मेलद्वारे समस्येचे निराकरण सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच नवीन प्रवेशपत्र जारी करून योग्य परीक्षा केंद्र निश्चित केले जाईल, असेही सांगितले आहे.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता
परीक्षेच्या अगदी तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी परीक्षेच्या तांत्रिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता NTA कडून सुधारित प्रवेशपत्र कधी जारी केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
