नवी दिल्ली, दि. १५ वृत्तसंस्था:केंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीए सरकारच्या काळात २००५ मध्ये सुरू झालेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आता इतिहासजमा होणार आहे. तिचे नाव बदलून केंद्र सरकार ‘विकसित भारत-जी राम जी रोजगार आणि आजीविका अभियान (ग्रामीण) २०२५’ ही नवी योजना आणली जाणार आहे.
ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत या बदलाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मनरेगामुळे गेली २० वर्षे ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी मिळाली असली तरी, ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे, मनरेगाच्या मूळ उद्दिष्टाला बळकट करून आता या योजनेला ‘विकसित भारत २०२७’ या राष्ट्रीय व्हिजनशी जोडणे आवश्यक झाले आहे. नवीन योजनेत केवळ रोजगार हमी न देता, सक्षमीकरण, विकास आणि सरकारी योजनांचा परिपूर्ण लाभ देण्यावर भर असेल, जेणेकरून एक समृद्ध ग्रामीण भारत उभा राहील. या बदलावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव का काढले जात आहे, असा थेट सवाल उपस्थित करत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

