मुंबई दि. १७ विशेष प्रतिनिधी:नॅशनल हेराल्ड प्रकरणात काल राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिलासा मिळाला. ईडीची याचिका दाखल करून घेण्यासाठी न्यायालयाने नकार दिल्यानंतर भारतीय जनता पक्षावर राजकीय सूडबुद्धीचा आरोप मुंबई काँग्रेसने केला. वरळी येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. या ठिकाणी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणा देण्यात आल्या. “मोदीजी और बीजेपी माफी मांगो माफी मांगो, सत्य की जीत निश्चित है”, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्ते जोरजोरात देत होते. जोरदार निदर्शने करण्यात आली.
वरळी येथे ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कालच न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. त्यामुळे काँग्रेसने ईडीवर जबरदस्त ‘उडी’ मारल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात सत्ताधारी आणि काँग्रेस पक्ष यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचण्याची ही नांदी मानली जाते.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हेगारी कटाचा आरोप करत नवा गुन्हा दाखल केला होता. कालच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने तपासाच्या मूळ मुद्द्यांवरती अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा होता की, सीबीआयने अजूनपर्यंत कुठलाच प्रेडिकेट गुन्हा नोंदवलेला नाही, तरीही ईडीने पीएमएलए (PMLA) अंतर्गत तपास सुरू ठेवला आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे ईडी बॅकफूटवर गेली आणि त्याचाच परिणाम म्हणून न्यायालयाने अखेर गांधी माय-लेकांना दिलासा दिला.
या सगळ्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटण्याची चिन्हे दिसत होती. मात्र आज सकाळी सकाळीच मुंबई काँग्रेसने थेट अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) वरळी कार्यालयावर जोरदार धडक दिली आणि भाजप तसेच मोदी यांच्या विरोधी घोषणा देत तेथील परिसर दणाणून सोडला. सकाळीच झालेल्या काँग्रेस पक्षाच्या निदर्शनामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली. या निदर्शनामध्ये खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचे सर्व लहान-मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर हे आंदोलन काँग्रेससाठी किती परिणामकारक ठरेल, याबाबत सध्या मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे.

