औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप

गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडत आहे, व त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षीण गडचिरोलीत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

गडचिरोली जिल्ह्याचा आजचा दिवस ‘आरोग्य क्रांती दिवस’ म्हणून नोंदविला जाईल, कारण येथे औद्योगिक विकासाबरोबर आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडत आहेत. अहेरी येथील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय हे खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके अत्याधुनिक बनले असून, येथे मातृत्व, बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

यासोबतच भामरागड तालुक्यातील कोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, जरावंडी व ताडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन, वेंगनुर उपकेंद्र आणि रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले. तसेच, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कोरची व सिरोंचा या तालुक्यांतील नव्या सार्वजनिक आरोग्य पथकांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्हा ‘देशातील स्टील हब’ बनत आहे, पण या औद्योगिक विकासासोबतच गडचिरोलीला ‘ग्रीन हब’ बनवायचे आहे. त्यासाठी पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. दळणवळण सुधारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, पूल व नाले बांधकामाची कामेही वेगाने सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *