02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जात असून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडून शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, रस्ता सुरक्षा रॅली, महिला सुरक्षा रॅली, सायबर अवेयरनेस इ. प्रकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकी ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी, डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर, शालीनीताई मेघे रक्तपेढी, नागपूर यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडू आलाम सभागृहामध्ये तसेच पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलातर्फे आतापर्यंत पाच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये एकुण 4361 रक्दात्यांनी रक्तदान केले आहे. पोलीस अधिकारी- कर्मचारी आणि एकूण 08 आत्मसमर्पित नक्षली सदस्य यासोबतच पोस्टे/उप-पोस्टे/पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिकांनी यात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन एकूण 1203 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी रक्तदानाचे महत्व पटवून सांगितले की, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे.
एवढेच नव्हे तर रक्तदाता म्हणून सहभागी होऊन आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेणेबाबत त्यांनी आवाहन केले. रक्तदान केल्याने त्या रक्ताचा उपयोग एखाद्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी होणार आहे. विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरापैकी गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र गडचिरोली व डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर येथील टिम, पोलीस स्टेशन देसाईगंज येथे शालीनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर येथील टीम, पोलीस उप-मुख्यालय अहेरी (प्राणहिता) येथे शालीनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर व उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी येथील टिम तसेच सिरोंचा येथे डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर येथील टीम उपस्थित राहुन रक्त संकलन करण्याचे काम केले व रक्तदान शिबिराला सहकार्य केले.
या रक्तदान शिबिर प्रसंगी श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, डॉ. वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली, श्री. अनिकेत हिरडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक व इतर पोलीस अधिकारी तसेच उपजिल्हा रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे डॉ. सुनिल मडावी, हेडगेवार रक्त केंद्र नागपूरचे श्री. अशोक पत्की, श्री. गिरीष देशपांडे, श्री. सुहास खरे, शालीनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूरचे श्री. अश्विन रडके, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट नागपूरचे श्री. राजीव वरभे हे उपस्थित होते.
या विविध ठिकाणच्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उप-पोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार तसेच सर्व रक्तकेंद्रांच्या संपूर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.
