आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व म. फुले जनआरोग्य योजना
चंद्रपूर, दि.25 : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत असलेल्या पॅनलमध्ये शासकीय रुग्णालयांची संख्या जास्त असून खाजगी रुग्णालय कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुका स्तरावरील किमान एक खाजगी रुग्णालय शासनाच्या पॅनलवर समाविष्ट करण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.24) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, या योजनेंतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील 100 रुग्णालयांचा शासकीय पॅनलमध्ये समावेश आहे. त्यापैकी 82 रुग्णालये ही शासकीय असून खाजगी रुग्णालये 18 आहेत. या 18 खाजगी रुग्णालयांपैकी 1 चिमूर येथे तर 1 ब्रम्हपुरी येथे आहे. उर्वरीत 16 खाजगी रुग्णालये ही चंद्रपूर शहरातील आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत तालुका स्तरावरील नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ही सुविधा त्यांना मिळावी म्हणून प्रत्येक तालुक्यात किमान एक खाजगी रुग्णालय शासकीय पॅनलमध्ये असणे गरजेचे आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे.
आयुष्मान भारतचे कार्ड काढण्यासाठी सर्व आशा स्वयंसेविकांचे लॉगिन आयडी त्वरीत कार्यान्वित करा. रोज किती आयुष्मान भारत कार्ड काढले, त्यात ग्रामीण आणि शहरी किती, याची दैनंदिन आकडेवारी आरोग्य विभागाने घेऊन तसा अहवाल सादर करावा. ही मोहीम मिशन मोडवर राबवावी, अशा सुचनाही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.
बैठकीला अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या डॉ. नयना उत्तरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. श्वेता सवळीकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा, उपायुक्त संजय चिद्रावार, नायब तहसीलदार प्रियंका मानकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा : यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण समन्वय समितीचा आढावा घेऊन सुचना दिल्या. शाळा – महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखु विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच तंबाखुचे दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी. शासकीय कार्यालयातसुध्दा तंबाखु प्रतिबंधासाठी तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
