गडचिरोली:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित गोंडवाना इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तांत्रिक कौशल्य, एकाग्रता आणि दृढनिश्चयाच्या जोरावर अकादमीच्या खेळाडूंनी इंडियन राउंड प्रकारात वर्चस्व गाजवत ऑक्टोबर २०२६ मध्ये आसाम येथे होणाऱ्या आगामी ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
इंडियन राउंड पुरुष गटात निखिल भोयर याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले, तर त्याचा सहकारी आदित्य नाईगमकर याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले. इंडियन राउंड महिला गटात दिया बॅनर्जी हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
ठळक कामगिरी
इंडियन राउंड – पुरुष गट
* निखिल भोयर : प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
* आदित्य नाईगमकर : तृतीय क्रमांक (कांस्यपदक)
इंडियन राउंड – महिला गट
* दिया बॅनर्जी : प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
खेळाडूंच्या या यशाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले:
“गोंडवाना इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या आपल्या तिरंदाजांनी केलेल्या असाधारण कामगिरीचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. निखिल, दिया आणि आदित्य यांनी अव्वल स्थान मिळवणे हे त्यांच्या वैयक्तिक जिद्द, शिस्त आणि समर्पणाचेच नव्हे, तर आमच्या प्रशिक्षकांच्या निष्ठेचे आणि मेहनतीचेही प्रतीक आहे.
लॉयड्समध्ये आम्ही तळागाळातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना प्रगतीच्या अधिकाधिक संधी व सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल मी संपूर्ण संघाचे अभिनंदन करतो. राष्ट्रीय स्तरावर आमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंना भविष्यात अधिक मोठे यश मिळो आणि त्यांच्या वाटचालीत सातत्याने नवनवीन संधी उपलब्ध होवोत, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.”
ही उल्लेखनीय कामगिरी प्रादेशिक स्तरावर तिरंदाजीच्या विकासासाठी आणि उदयोन्मुख क्रीडा प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे योगदान अधिक दृढ करणारी आहे. अकादमीच्या या उपक्रमांना लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन (LIF) आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांचे पाठबळ लाभले आहे. युवा खेळाडूंना सक्षम बनवणे आणि त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, यासाठी या संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करते. आता हे खेळाडू आसाम येथे होणाऱ्या आगामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहेत.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन (LIF) यांच्या पाठबळावर कार्यरत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे उद्दिष्ट क्रीडा प्रतिभा विकसित करणे, तळागाळातील क्रीडा विकासाला बळकटी देणे आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवणे हे आहे.
