
मुंबई : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्याचे सांगत महिलांसाठी हे शहर सुरक्षित असल्याचा दाखला दिला जातो. मात्र, आता मुंबईदेखील भरदिवसा महिलांसाठी सुरक्षित नाही का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचा धावत्या रिक्षात विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने रिक्षा चालकाच्या गळ्याला चाकू लावून हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वांद्रे परिसरात घडली.
वांद्र्यात भरदुपारी एका 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा रिक्षात घुसून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्दीच्या वेळेत सिग्नलला थांबलेल्या रिक्षात एक अनोळखी व्यक्ती शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवत रिक्षा पुढे नेण्यास भाग पाडले. रिक्षा सुरू झाल्यानंतर, या व्यक्तीने मागील सीटवर बसलेल्या तरुणीवर अश्लील टिप्पणी करत तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
