कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत वाढवली

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश

चंद्रपूर : आकारणी वर्ष २०२६-२७ साठी कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ ऐवजी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कर ऑडिट अहवाल व प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते की, व्यावसायिक व कर सल्लागार हे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्तीकर विवरणपत्रे भरण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलवरील युटिलिटीमध्ये झालेले बदल, आर्थिक विवरणपत्रांची जुळवणी व पडताळणी, तसेच जीएसटी व टीडीएस/टीसीएस च्या वैधानिक पूर्ततेमुळे कर सल्लागार आणि करदात्यांवर मोठा ताण आला होता. या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आयकर कायद्यानुसार मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली होती.

या मागणीचा सकारात्मक विचार करून आयकर विभागाने कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ वरून वाढवून २१ ऑक्टोबर २०२६ केली आहे. तसेच कर ऑडिट आवश्यक असलेल्या संस्था/व्यक्तींसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ वरून वाढवून २१ नोव्हेंबर २०२६ करण्यात आली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि लोकहितकारी मागणीमुळे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि कर सल्लागारांना मोठा दिलासा मिळाला असून सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *