लोकाभिमुख प्रशासनातूनच शासनाच्या योजनांचे उद्दिष्ट साध्य होईल – आ. किशोर जोरगेवार

भर पावसातही महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासनाच्या लोककल्याणकारी योजना केवळ शासननिर्णयांपुरत्या मर्यादित न राहता त्या समाजातील शेवटच्या आणि गरजू नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला कोणत्याही अडथळ्याविना शासकीय योजनांचा लाभ मळिणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन जनहिताचे निर्णय घेत असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा एकाच जागेवर उपलब्ध व्हाव्यात, शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या वतीने आज (दि. 22) शहरातील गांधी चौक येथे महाराजस्व अभियान घेण्यात आले. विशेष म्हणजे गत दोन दिवसांपासून चंद्रपुरात पावसाची संततधार असतांनाही भर पावसात नागरिकांनी महाराजस्व अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, उपायुक्त शेषराव राळे, तहसीलदार विजय पवार, भूमि अभिलेख उपअधीक्षक भुमरेड्डी गिज्जेवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजप महानगर प्रभारी अर्चना देहनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रा. अशोक जिवतोडे, भाजप महामंत्री रविंद्र गुरुनुले, गटनेता शेखर शेट्टी, नगरसेवक भालचंद्र दानव, जितेश कुळमेथे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, रयतेसाठी रामराज्य आणि शिवराज्याची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार काम करीत आहे. शासकीय कामासाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. आता मात्र एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रांचे वाटप होत आहे. 20 प्रकारच्या लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात येणार असून सर्व घटकांना न्याय देण्याची अधिका-यांची भुमिका कौतुकास्पद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाचे काम सुरू झाले आहे. नागरिकांनी त्वरीत कागदपत्रांची पुर्तता करावी. तसेच आज ज्यांना लाभ मळिाला आहे, त्यांनी शासकीय योजनांची माहिती इतरांना सांगून योजनांच्या लाभासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विकास कुमार मेश्राम यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार तहसीलदार विजय पवार यांनी मानले.लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पंचशील महिला बचत गट, शारदा महिला बचत गट, मैत्री महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट यांना कर्ज वाटपाचे प्रमाणपत्र, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत शंकर बुराण, हिरालाल लोनगाडगे, सुनील उरकुडे यांना प्रमाणपत्र, जिवंत सातबारा अंतर्गत बाबा वैद्य यांना लाभ, श्रवणबाळ योजनेंतर्गत सुर्यभान देवाळकर, दीपक घुगरे, माया येडे यांना, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सचिन देठे यांना, राशनकार्ड वाटप अंतर्गत कल्पना तोडासे, कुंदा नेवलकर, सुषमा जगताप यांना लाभ देण्यात आला. तसेच सिंधी समाज विस्तापित पट्ट्यांचे वाटप, संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पती-पत्नीच्या संयुक्त नावे ७/१२ उताऱ्यां चे वितरण, लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप, दिव्यांग कल्याण धोरणांतर्गत २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरी, वन्यप्राण्यांमुळे पशुधन व मनुष्यहानीबाबत नुकसानभरपाईचे वितरण, कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वितरण, मोजणी क्रमांक प्रत सनद वाटप, छायाचित्रण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्जवाटप, रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभांचे वितरण तसेच बीएलओंचा सत्कार अशा विविध शासकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *