चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी’ ॲपचे लोकार्पण

 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ॲपद्वारे १,००० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची ऑफलाइन ओळख शक्य

जैवविविधता संवर्धन आणि नागरिक विज्ञान (Citizen Science) क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) विकसित केलेल्या LepiScan ‘लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी’ या अभिनव मोबाईल ॲपचे नुकतेच लोकार्पण झाले.
लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी हे फुलपाखरांच्या प्रजातींची जलद आणि अचूक ओळख करून देणारे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मोबाईल ॲप आहे. विशेष बाब म्हणजे हे ॲप ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इन-हाऊस विकासकांच्या चमूने पूर्णपणे विकसित केले आहे. देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाने अशा प्रकारचे ॲप विकसित करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न आहे. पक्षी आणि इतर काही वन्यजीवांच्या ऑफलाइन ओळखीसाठी ॲप उपलब्ध असले तरी फुलपाखरांच्या ओळखीसाठी समर्पित ऑफलाइन ॲपची कमतरता होती. निसर्गप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेले हे ॲप फुलपाखरांविषयीचे अध्ययन अधिक सुलभ, आकर्षक आणि परस्परसंवादी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

पूर्णपणे ऑफलाईन कार्यक्षमता हे या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसलेल्या दुर्गम वनक्षेत्रातही फुलपाखरांच्या प्रजातींची ॲपद्वारे अचूक ओळख करता येते. भारतात आढळणाऱ्या १,००० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींचा सर्वसमावेशक डेटाबेस या ॲपमध्ये उपलब्ध आहे. नागरिक विज्ञानाचे प्रभावी साधन म्हणून हे ॲप फुलपाखरांविषयी महत्त्वपूर्ण अनुभवजन्य माहिती संकलित करण्यास मदत करेल. त्यामुळे वन अधिकारी आणि संशोधकांना अधिक प्रभावी संवर्धन धोरणे तयार करण्यास सहाय्य मिळेल. या ॲपमध्ये “Report Unidentified Butterfly” हे वैशिष्ट्य उपलब्ध असून त्याद्वारे वापरकर्ते अपरिचित अथवा संभाव्य नवीन फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती व छायाचित्रे ॲपमधील Google Form च्या माध्यमातून पाठवू शकतात. तसेच ॲपमध्ये अद्याप समाविष्ट नसलेल्या प्रजातींचीही नोंद करता येते, ज्यामुळे फुलपाखरांचा डेटाबेस सातत्याने अद्ययावत आणि अधिक व्यापक होत राहील. हे ॲप Google Play Store वर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *