जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत “आ. विजय वडेट्टीवार’ ठरले किंगमेकर

भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा

ब्रम्हपुरी, मुल, नागभीड, घुग्गुस, बल्लारपूर, वरोरा, राजुरा नगर परिषदेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष

आज चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करीत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा राहिला हे विशेष.

आज पार पडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निकालात विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा गृह मतदार संघ असलेल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी येथे जिल्ह्यात काँग्रेसने सर्वात मोठा विजय मिळवला. यात ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार यांचे सह काँग्रेस पक्षाचे २१ नगरसेवक विजयी झाले. तर भाजप नेते आ.सुधीर मुनगंटीवार, चिमूर आ.कीर्तीकुमार भांगडिया, चंद्रपूर आ.किशोर जोरगेवार, वरोरा आ.करण देवतळे यांच्या गडाला सुरुंग लावत विधिमंडळ पक्षनते आ .विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या बल्लारपूर, मूल, नागभीड , घुग्गुस, वरोरा, राजुरा नगरपरिषदेवर काँग्रेसने नगराध्यक्ष पदाच्या रस्सीखेच शर्यतीत घवघवीत यश मिळविले आहे.

तत्पूर्वी नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजताच काँग्रेस पक्षाने नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर दिली होती. पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर खरे उतरून विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यात थेट भाजपा आमदारांच्या मतदार संघात जाऊन काँग्रेसच्या वतीने अतिशय चातुर्य बुद्धीने विरोधकांचे मनसुबे उधळून लावत एकतर्फा किल्ला लढविला. तर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची धुरा अंगीकारू ठिकठिकाणी सभाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीवर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्याचे मनोबल वाढवून विजयाची मुहूर्तमेढ रोवली.

विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची फलश्रुती आज आलेल्या निवडणुकीच्या निकालातून दिसून आली. जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाने मिळवलेले घवघवीत यश हे राज्यातील भाजप सरकारचे अन्यायकार धोरण, मतदारांमध्ये लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या सरकार विरुद्ध होत असलेली जनजागृती, काँग्रेस पक्षाची एकजूट व काँग्रेस कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत याची फलश्रुती असून ही देशात व राज्यात पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये परिवर्तनाची नांदी असल्याचे मत विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. तर काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी शहरामध्ये फटाक्यांची आतषबाजी, एकमेकांना पेढे भरवून सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *