१८ हजारांच्या थकीत पगाराचा संताप, चंद्रपुरात ट्रक चालकाने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवला, २४ तासांत पोलिसांचा मोठा उलगडा, 2 आरोपी अटकेत, 1 फरार

मेहनतीचा घाम गाळूनही वेळेवर पगार न मिळाल्यास एखादा कर्मचारी किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण चंद्रपुरात समोर आलं आहे. पत्नीच्या बाळंतपणासाठी खर्च म्हणून आवश्यक असलेली १८ हजार रुपयांचे थकीत वेतनाची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने सिलिंडरने भरलेला ट्रकच पळवून नेला. एवढंच नाही, तर ट्रकमधील गॅस सिलिंडर विकून मालकाला आर्थिक फटका देण्याचाही प्रयत्न केला.

मात्र पोलीस तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा करत राजेंद्र काळे आणि कुणाल घुरुडे या चंद्रपुरात राहणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.

चोरीला गेलेले 342 गॅस सिलिंडर, विक्रीतून मिळालेली लाखो रुपयांची रोकड आणि ट्रक जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील सिलिंडर विकत घेणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा येथील मोहित पोद्दार नामक आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. मेहनतीचा मोबदला वेळेवर न मिळाल्याने निर्माण झालेला संताप आणि त्यातून घडलेला हा गुन्हा सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *