महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूरसह सीमावर्ती गावांमध्ये तेलंगणा वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर (खुर्द), कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दशकांपासून शेती करत असलेल्या जमिनीवर अचानक कारवाई करत वृक्षलागवडीचे कारण देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे सीमावर्ती भागातील तणाव पुन्हा वाढला असून, शेतकरी न्याय आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
