चंद्रपूर शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. चंद्रपूर -नागपूर मार्ग असो वा गडचिरोली- बल्लारपूर मार्ग या सर्वच मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक शहरवासीयांच्या मुळावर उठली आहे. कालच दोन वेगवेगळ्या घटनात दोन मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी शहरातील अतिव्यस्त बंगाली कॅम्प चौकात सायकलीने रोज मजुरी करण्यासाठी जाणाऱ्या छत्तीसगढी महिलेला मालवाहू ट्रकने चिरडले. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रोज शहरातील अतिव्यस्त चौकांमध्ये वाढणारे अपघात नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरले आहेत.
शहराला वळण मार्गाची गरज असताना यापूर्वी योजनेत असलेले वळण मार्ग रद्द करून जिल्हा प्रशासनाने घोडचूक केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे मनपातील विरोधी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. वळण मार्ग नव्याने निश्चित करून कामाला सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या चौकात अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे
