खासदार प्रतिभा धानोरकर यांचा पुढाकार : महापालिका शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी आता शिक्षक जाणार ‘डोअर टू डोअर’

तीन झोनमध्ये उभारणार तीन भव्य सांस्कृतिक सभागृहे; अभ्यासिकांसाठीचा निधी ३ लाखांपर्यंत वाढवण्याचे निर्देश

चंद्रपूर : शहरातील महानगरपालिका शाळांची संख्या ४६ वरून २६ वर येणे ही बाब अत्यंत चिंताजनक असून, सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

महानगरपालिका शाळांची घसरलेली पटसंख्या सुधारण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका मांडली. आयुक्त आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम आखून सर्व शिक्षकांना आपापल्या परिसरातील घराघरांत जाऊन जनजागृती करण्याचे निर्देश द्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. ज्या भागात पालकांचा कल अधिक आहे, तिथे तातडीने सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

शहरातील बंद पडलेल्या शाळांच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याऐवजी तो सामाजिक हितासाठी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. झोन क्र. १ मधील सरदार पटेल कन्या शाळा, झोन क्र. २ मधील अभ्यंकर शाळा आणि झोन क्र. ३ मधील माता कस्तुरबा शाळा या ठिकाणी ‘राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम’ (NCAP) आणि खनिज विकास निधीतून भव्य सांस्कृतिक सभागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही सभागृहे गरीब व गरजू नागरिकांना लग्न आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जातील, ज्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या अभ्यासिकांच्या दुरवस्थेवरही खासदारांनी कडक ताशेरे ओढले. अटल बिहारी वाजपेयी आणि कोलबा स्वामी अभ्यासिकेत अस्वच्छता आणि पुस्तकांचा मोठा तुटवडा असल्याने, अभ्यासिकांची वार्षिक तरतूद १ लाखावरून ३ लाख रुपये करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, प्रत्येक अभ्यासिकेत पूर्णवेळ कर्मचारी आणि स्वच्छतेसाठी विशेष पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश दिले. महात्मा फुले आणि पंडित नेहरू शाळेचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी स्वतः स्थळ पाहणी करावी, असे आदेशही यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *