चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे आक्रमक ‘गो गोवा’ आंदोलन, जनतेच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी गोव्यात उधळपट्टी केल्याचा नगरसेवक विवेक बोढे यांचा घणाघात

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूसशहरातील पाणीटंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून, जनतेच्या तब्बल २० लाख रुपयांच्या कररुपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकांविरोधात घुग्घूस शहरात जोरदार राजकीय भडका उडाला. घुग्घूस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व उप-नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक शासकीय पैशातून ‘गोवा वारी’वर गेल्याचा थेट आरोप करत भाजपा नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र ‘गो गोवा आंदोलन’ केले.

प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ मौजमजा आणि शासकीय निधीची लूट करण्यासाठीच ही गोव्याकडे झेप घेण्यात आली आहे, असा आरोप भाजपने केला. गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षांची केबिन बंद असल्याने सामान्य जनतेची शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. “विकास गेला खड्ड्यात आणि हे चाललेत जनतेच्या पैशाने गोव्याला,” अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. भीषण उन्हाळ्यात संपूर्ण शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना पदाधिकारी मात्र गोवा सहलीवर आहेत. शहरात नागरिकांच्या नळाला पाणी नाही, शुद्ध पाण्याचे आरो (RO) प्लांट बंद पडले आहेत, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि रात्रीच्या वेळी शहरात पथदिवेही लागत नाहीत; अशा गंभीर परिस्थितीत काँग्रेसचे नगर परिषदेतील पदाधिकारी गंभीर नसल्याचे भाजपने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *