चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पोडसा पुलाचा मार्ग तेलंगणा सरकारने अवैध कमान उभारून केला बंद

चंद्रपूर ते हैदराबाद जाणाऱ्या या शॉर्टकट मार्गावर आता केवळ छोटी वाहने जाऊ शकणार असल्याने वाहनधारकांना वेळ व इंधन असा दुहेरी फटका, पोडसा ग्रामपंचायतीने दिला हायकोर्टात जाण्याचा इशारा, तेलंगणा सरकारने उभारलेली लोखंडी कमान तातडीने काढून टाकण्याची मागणी

 चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पोडसा पुलाचा मार्ग तेलंगणा सरकारने अवैध लोखंडी कमान उभारून अचानक बंद केला. चंद्रपूर ते हैदराबाद जाणाऱ्या या शॉर्टकट मार्गावर आता केवळ छोटी वाहने जाऊ शकणार असल्याने वाहनधारकांना वेळ व इंधन असा दुहेरी फटका बसणार आहे. वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाची राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तेलंगणा राज्याने संयुक्तपणे निर्णय घेऊन निर्मिती केली होती. दोन राज्यांच्या सीमेवर असलेला हा पूल मात्र तेलंगणा सरकारने अचानक अवजड वाहनांसाठी बंद केल्याने या भागातून होणारी रुग्णवाहिका आणि व्यापारी वाहतूक ठप्प झाली आहे.

एकीकडे हा मार्ग बंद झाला आहे. मात्र 30 किलोमीटरचा फेरा घालून मुख्यमार्गाने जाऊ शकणाऱ्या आर्वी मार्गावर मात्र अवजड वाहनांमुळे मार्गाची चाळण केली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयाने या भागातील नागरिकांना मोठा फटका बसणार असून यासंबंधीची कुठलीही नोटीस अथवा सूचना परिसरातील नागरिकांना तेलंगणा सरकारने दिलेली नाही. तेलंगणा सरकारच्या या दंडेलशाही निर्णयाविरोधात पोडसा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून वाहतूक सुरळीत न झाल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तेलंगणा सरकारने उभारलेली लोखंडी कमान तातडीने काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *