चंद्रपूर महाराष्ट्र:पर्यटकांचा निसर्गानुभव अधिक समृद्ध करण्यासोबतच स्थानिक समुदायांच्या उपजीविकेला चालना देण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने एक अभिनव व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) वन्यजीव अनुभव सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन श्री. गणेश नाईक, मा. वनमंत्री, महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष तयार करण्यात आलेल्या सहा मिनिटांच्या व्हीआर चित्रफितीतून ताडोबाच्या जंगलात विविध ऋतूंमध्ये दिसणाऱ्या समृद्ध जैवविविधतेचे सखोल दर्शन घेता येणार आहे. हा अनुभव पारंपरिक सफारीपलीकडे जाऊन पर्यटकांना वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचा अधिक जवळून व प्रभावी परिचय करून देतो. त्यामुळे प्रकल्पाच्या पर्यावरणीय संपन्नतेबद्दलचे भान आणि अभिमान वाढीस लागेल.
या उपक्रमासाठी व्याघ्र प्रकल्पातील विविध प्रवेशद्वारांवर व्हीआर संच ठेवण्यात येत आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर उपलब्ध असलेल्या सफारी जिप्सींच्या संख्येनुसार व्हीआर संचांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हा अनुभव सहज व सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल.
महत्त्वाचे म्हणजे, हा उपक्रम स्थानिक रोजगारनिर्मितीशी जोडलेला आहे. प्रत्येक व्हीआर संच स्थानिक युवकांच्या स्वाधीन करण्यात आला असून तेच याचे व्यवस्थापन करतील. प्रत्येक प्रेक्षकाकडून प्रती दर्शन ₹५० इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. या माध्यमातून बफर क्षेत्रातील सुमारे ४० स्थानिकांना थेट रोजगार व शाश्वत उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे.
सध्या मोहर्ली आणि खुटवं याडा प्रवेशद्वारांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असून पुढील आठवड्यात सर्व प्रवेशद्वारांवर ती उपलब्ध होणार आहे. तसेच, मागणीनुसार निवडक रिसॉर्ट्समध्येही हे व्हीआर संच उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. ‘चला माझा ताडोबा’ या उपक्रमांतर्गत चालणाऱ्या निसर्ग शिक्षण कार्यक्रमाशीही या अनुभवाची सांगड घातली जाणार आहे.
हा उपक्रम म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जबाबदार पर्यटन, स्थानिक समुदायांचा सहभाग आणि वन्यजीव संवर्धनाच्या अभिनव सादरीकरणाबाबतच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. तंत्रज्ञान आणि संवर्धन यांची सांगड घालत हा व्हीआर अनुभव पर्यटकांना समृद्ध अनुभूती देण्यासोबतच स्थानिक समुदायांना सक्षम बनविणार आहे.
दिनांक: ३० एप्रिल २०२६
प्रेषक:
प्रभू नाथ शुक्ला
क्षेत्र संचालक
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
