मुख्य रस्त्यांवर असलेली दारू दुकानं आणि बार स्थलांतरित करण्यासाठी चंद्रपूर शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जटपुरा गेट ते उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेली दारू दुकानं आणि बार हे स्थलांतरित करण्यात यावे अशी या मोर्चाची मुख्य मागणी होती. या दुकानांमुळे स्थानिक लोकं, लहान मुलं आणि महिलांना मोठा त्रास होत असल्याचा मनसेचा आरोप आहे. या दुकानांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते आणि त्याच ठिकाणी लोकं दारू पीत असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि महिलांना त्रास होतो असाही आक्षेप मनसे कडून घेण्यात आला आहे.
