चंद्रपूर जिल्ह्यात शाळेत जाण्यासाठी तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ही घटना असून ईशान सत्यपाल आत्राम असं मृतक विद्यार्थ्यांचं नाव आहे. चौथ्या वर्गात शिकणारा ईशान सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत असतानाच अचानक खाली कोसळला. पालकांनी त्याला तातडीने शहरातीलच एका रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ईशानचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मात्र मृतदेहाचे शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
