27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी विशेष अभियान
चंद्रपूर, दि. 22 : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत दि. 27, 28 व 29 सप्टेंबर 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध योजनांशी संबंधित शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना तसेच मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत.
शिबिरापूर्वी वस्ती स्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक समन्वय साधण्यात येणार असून शिबिरांचे ठिकाण व वेळ याबाबतची माहिती संबंधित तालुका प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी अभियानात सहभागी होऊन उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी केले आहे.
00000
