विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २ अंतर्गत तब्बल ५४ कोटी रुपयांचा रस्ते विकास कामांना सुरवात करण्यात आली असून, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या निधीमुळे अनेक प्रलंबित रस्ते कामांना गती मिळणार असून, वाहतूक सुलभ होण्यास मोठी मदत होणार आहे.
या निधीसाठी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून तसेच संबंधित विभागांशी चर्चा करून त्यांनी या निधीला मंजुरी मिळवून दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ अंतर्गत या विकास कामांमध्ये सावली तालुक्यातील राममा ९३० नवेगाव ते विरखल (७.७८ कोटी), प्रजिमा ११७ ते सिंगापूर रस्ता (१.८३ कोटी), प्रजिमा २९ ते राजोली चक रस्ता (६.५३ कोटी), प्रजिमा २९ गेवरा (बूज) ते बोरमाळा रस्ता (१२.७० कोटी), प्रजिमा २९ अंतरगाव ते गायडोंगरी (४ कोटी), सिंदेवाही तालुक्यातील राज्य मार्ग ३२२ लाडबोरी ते प्रमुख राज्यमार्ग ०९ (२.५८ कोटी), राज्यमार्ग ३२१ ते नांदगाव रस्ता (४.५ कोटी), ब्रम्हपुरी तालुक्यातील राज्य मार्ग ३२२ भूज ते प्रजिमा २९ मुडझा रस्ता (१४.५५ कोटी) अशा एकूण ५४ कोटी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे.
होऊ घातलेल्या या रस्ते विकास कामांमध्ये ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण रस्ते कात टाकणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून, शेतीमाल वाहतुकीलाही गती मिळणार आहे.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, “ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, रस्ते विकासाला प्राधान्य देत सातत्याने निधी आणण्याचे काम सुरू आहे. पुढील काळातही विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.” असेही ते म्हणाले.
स्थानिक नागरिकांनी या निधी मंजुरीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विकासाला निश्चितच नवी गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
