ईद-ए-मिलादुन्नबी हा प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र सण – विवेक बोढे
घुग्घुस : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त घुग्घुस येथे भाजपातर्फे मुस्लिम बांधवांना लड्डू वाटप करून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बुधवार, २६ ऑगस्ट रोजी गांधी चौक येथे भाजपाचे नगरसेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात भाजप तर्फे मिरवणुकीत सहभागी मुस्लिम बांधवांना लड्डू वाटप करण्यात आले.
जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने आमराई वॉर्ड चांद सावली दर्गा मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक गांधी चौकात पोहोचताच नगरसेवक विवेक बोढे यांनी मिरवणुकीत सहभागी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लड्डू वाटप करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीचा समारोप जामा मशीद येथे करण्यात आला.
यावेळी बोलताना नगरसेवक विवेक बोढे म्हणाले की, घुग्घुसची ओळख ही विविध जाती-धर्मातील नागरिकांमध्ये असलेल्या प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकतेमुळे आहे. ईद-ए-मिलादुन्नबी हा प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन आनंद वाटून घेतला, तर सामाजिक सलोखा अधिक मजबूत होतो. मुस्लिम बांधव हे घुग्घुसच्या सामाजिक व विकासात्मक वाटचालीतील महत्त्वाचे घटक असून त्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. धर्म वेगळे असले तरी माणुसकी आणि बंधुभाव हीच आपली खरी ओळख आहे.
या लड्डू वाटपाचा मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी लाभ घेतला. यावेळी स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, भाजपाचे युवानेते अमोल थेरे, विनोद चौधरी, सिनू इसारप, मुज्जू लोहाणी, हसन शेख, असगर खान, मोमीन शेख, आजम खान, खलील अहमद, मुस्तफा शेख, संजय जोगी, बबलू सातपुते, गणेश कुटेमाटे, उमेश दडमल, सचिन नांदे, योगेश घोडके, रवी घोडके, हेमंत कुमार, मधुकर धांडे, रज्जाक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
