सत्कारमूर्ती प्रत्येक महिला प्रेरणेची स्त्रोत – आ. किशोर जोरगेवार

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

आजचा क्षण आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाला, तिच्या जिद्दीला आणि तिच्या यशाला सलाम करण्याचा आहे. आई, बहीण, पत्नी, कामगार, अधिकारी आणि राजकीय अशा प्रत्येक भूमिकेत महिला आज सक्षमपणे उभ्या आहेत. घरसंसार सांभाळून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला खऱ्या अर्थाने प्रेरणेच्या स्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कार्यालयात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, महामंत्री रविंद्र गुरुनुळे, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्षा वंदना हातगावकर, केंद्र प्रशासक कल्याणी रायपूरे, बहुजन समता पर्व सचिव अॅड. वैशाली टोंगे, प्रा. रेखा सिंग, प्रणाली इंदुरकर, नगरसेविका अॅड. सारिका संदूरकर, नगरसेविका पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, आशा देशमुख, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, प्रलय म्हशाखेत्री, सारिका घटे आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथे देवतांचेही वास्तव्य असते असे सांगितले आहे. घर सांभाळताना, मुलांना संस्कार देताना, शेतीत, उद्योगात, शिक्षणात, प्रशासनात आणि समाजकार्यात महिलांनी आज आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज आपण ज्या महिलांचा सत्कार करत आहोत त्या केवळ व्यक्ती नाहीत, तर त्या प्रेरणेचे स्रोत आहेत. त्यांच्या यशोगाथा अनेक महिलांना पुढे जाण्याची दिशा देतील. या प्रत्येक महिलेमागे संघर्षाची कहाणी आहे, पण त्याचबरोबर जिंकण्याची जिद्दही आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सतत महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. स्वयंरोजगार, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक महिलेला मिळावा, ही आपली जबाबदारी आहे. आपल्या चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यात महिलांसाठी अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्यात. शिक्षण, रोजगार आणि सुरक्षित वातावरण ही माझी प्राथमिकता असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी १३८ महिलांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *