केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा:महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांसह चौघांना पद्मश्री जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी ४५ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या मानाच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्याच्या मातीतील कला जिवंत ठेवणारे लोकनाट्य तमाशा महर्षी रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रातील सेवाव्रती डॉ. अर्मिडा फर्नांडिस, कापूस संशोधनात क्रांती घडवणारे परभणीचे शेतकरी श्रीरंग लाड आणि तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये समाविष्ट असलेला पद्म पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा 3 श्रेणींमध्ये दिला जातो कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

लोककलेचा सन्मान: रघुवीर खेडकर (कला)

नगर जिल्ह्यातील तमाशा परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर’ या तमाशा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोककलेची सेवा केली. तमाशासारख्या ग्रामीण कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण लोककला विश्वात आनंदाचे वातावरण आहे.

वैद्यकीय क्षेत्रात क्रांती: डॉ. अर्मिडा फर्नांडिस (औषधोपचार)

मुंबईतील सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि ‘स्नेहा’ (SNEHA) संस्थेच्या संस्थापिका डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आशियातील पहिली ‘ह्युमन मिल्क बँक’ (मानवी दुग्धपेढी) स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. नवजात बालकांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य जागतिक स्तरावर नावाजले गेले आहे.

कृषी ऋषी: श्रीरंग लाड (कृषी)

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी श्रीरंग लाड यांना कापूस संशोधनातील त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोणत्याही मोठ्या पदव्या नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांनी कापसाच्या अशा वाणांचा शोध लावला, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उभारी मिळाली असून, एका सामान्य शेतकऱ्याचा हा गौरव कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

पालघरचे ‘तारपा सम्राट’ भिकल्या लाडक्या धिंडा

आदिवासी वारली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पालघरच्या वाळवंडे गावच्या या ९० वर्षीय कलाकाराने गेल्या १५० वर्षांची कौटुंबिक वादन परंपरा जिवंत ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *