मुंबई मनपात उद्धवसेना, मनसेशी आघाडी करणार नाही, असे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २४ तासांनी उद्धवसेनेने स्वबळाचे संकेत दिले. रविवारी सकाळी काँग्रेसविषयी अतिशय जपून बोलत उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा निर्णय घेण्यास ते (काँग्रेस नेते) समर्थ आहेत. आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. दरम्यान, मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास मुंबईपुरती मविआची मोट तुटेल. मात्र, राज्यभरात ती सोयीनुसार अस्तित्वात असेल.
उत्तर भारतीयांची मते राखण्यासाठी मनसेची संगत नको. म्हणून काँग्रेसने स्वबळाचा ठाम निर्णय घेतला. काही काही वॉर्डांमध्ये काँग्रेस समर्थक दलित, मुस्लिम मतांची उद्धव ठाकरे यांना आशा आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसविषयी सावध भूमिका घेत भाजपवर तुफान टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांना उद्धवशैलीतील खास टोमणे मारणेही टाळले.
बिहारच्या निकालाचे गणित अनाकलनीय
उद्धव यांनी असाही सवाल केला की, तेजस्वी यादवांच्या सभेला गर्दी एआयची होती का ? ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यांचे सरकार आले. बिहारचे गणित अनाकलनीय आहे. भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिहारच्या निकालावर जो जीता वही सिकंदर असे म्हटले होते. त्यावर उद्धव म्हणाले की, सिकंदर बनण्यामागचे रहस्य आजपर्यंत कोणी समजू शकलेले नाही. निवडणूक आयोग दुबार नोंदणी, बोगस पत्त्यांवर द्यायला तयार नाही असेही ते म्हणाले.
