बिहारच्या राजकारणात खळबळ; RJDच्या पराभवानंतर लालूंच्या कुटुंबात फूट

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचं पानीपत झालं आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. यंदाच्या निवडणुकीसाठी महागठबंधननं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित केलं. पण त्यांच्या नेतृत्त्वात लढलेल्या राजदला १४३ पैकी केवळ २५ जागा जिंकता आल्या. यानंतर आता पक्षात यादवी माजली आहे. लालू यांच्या कुटुंबात फूट पडली आहे.

लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रतापला आधीच कुटुंबातून हाकललं आहे. तेज प्रताप यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण त्यांचा महुआ विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. यानंतर त्यांनी तेजस्वी यादव यांना लक्ष्य केलं. त्यांनी तेसस्वी यांचा उल्लेख फेलस्वी असा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या नेत्यांवर स्तुतीसुमनं उधळली. त्यानंतर आता लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी मोठा राजकीय धमाका केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राजकारण सोडण्याची आणि कुटुंबासोबतचे सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.

रोहिणी आचार्य यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंध तोडतेय. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करायला सांगितलं. सगळा दोष मी माझ्यावर घेतेय,’ असं रोहिणी आचार्य यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. रोहिणी यांच्या पोस्टनं बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. महागठबंधनच्या पराभवानंतर राजदवर प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण महागठबंधनचं नेतृत्व राजदकडे होतं. त्यानंतर आता कुटुंब कलहामुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *