आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना खेचून आणलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे.
280 कोटी रु. खर्चून बांधलेल्या हे रुग्णालय जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे. हे रुग्णालय १४० बेड क्षमतेचे आहे.
यात अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री असेल. सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह , सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators), ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. विशेष उपचार विभागात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी तर सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींबाबत आधुनिक प्रयोगशाळा राहणार आहे.
या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्व विदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने कॅन्सर उपचार देणारे केंद्र ठरणार आहे.
