चिमूर तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला, शंकरपूर परिसरात आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. शंकरपूर परिसरात पुन्हा एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. गेल्या दीड महिन्यात शंकरपूरच्या दोन किलोमीटर परिसरात तीन शेतकऱ्यांचा जीव वाघाच्या हल्ल्यात गेला आहे.काल दुपारी ५२ वर्षीय ईश्वर भरडे हे शंकरपूर-आंबोली रोडवरील ठाणा रिठ परिसरात त्यांच्या शेतात पिकाची पाहणीसाठी गेले होते.

मात्र संध्याकाळपर्यंत ते परत न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या मदतीने शोध घेतला आणि शेतातच त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी शंकरपूर-भिसी मार्गावर आंबोली गावाजवळ रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टरवर मृतदेह ठेवत रात्री रास्ता रोको केला. अखेर प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबाला वनविभागात नोकरी देण्याचं आणि वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आणि मृतदेह चिमूर येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *