चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती चे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे निलंबित

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले. परमेश्वर मेश्राम या 55 वर्षे शेतकऱ्याने मागील शुक्रवारी भद्रावती तहसील कार्यालयात विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शेतजमिनीचा फेरफार करण्यास तहसील कार्यालयाकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले होते. मेश्राम यांची भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथे 8.5 एकर वडिलोपार्जित जमीन असून न्यायालयात सुरू असलेली केस त्यांनी जिंकली होती मात्र तरीदेखील गेल्या दोन वर्षांपासून ते फेरफार साठी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत होते. अखेर त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी विष घेतले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी या प्रकरणाने भद्रावती तालुक्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या विरोधात संतापाची तीव्र लाट उमटली होती. अखेर प्रशासनाने दोन्ही अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासात दोषी मानून निलंबित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *