किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे प्रकरण
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक झाली आहे. तीही चक्क बँकेकडुन. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज असून माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सख्ख्या काकू असून चंद्रपूर जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील विदर्भ -कोकण ग्रामीण बँक शाखेतून या कोलाम आदिवासी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आलं.
धक्कादायक म्हणजे या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडे शेतीचा कुठलाही सात-बारा नसताना बनावट सातबारा तयार करून काही दलाल आणि बँकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही फसवणूक केल्याचा संशय आहे. 2022 मध्ये एकाच दिवशी पीक कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर कर्ज वाटप करण्यात आलं. दीड लाख ते एक लाख 65 हजार रु. पर्यंत हे पीक कर्ज वाटण्यात आलं असून पीडित शेतकऱ्यांना मात्र हातात अवघे दहा ते पंधरा हजार दिले गेले. या प्रकरणात गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये सध्या 33 पीडित शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही सरकारची नवी योजना आहे असे 2022 च्या या प्रकरणात सर्वांना सांगण्यात आले. सरकारने पीडित शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच या प्रकरणातील दलाल आणि बैंकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शोभाताई फडणवीस यांनी केली आहे.
