वन्यप्राणी-मानव संघर्ष रोखण्यासाठी तातडीची अंमलबजावणी करा; 30 दिवसांत भरपाई देणे अनिवार्य – आ. सुधीर मुनगंटीवार

नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळण्यासाठी कृषी-वन विभागाची संयुक्त समिती गठित करण्याचे निर्देश

एआय तंत्रज्ञानाचा वापर, बीट गार्ड व पशुवैद्यकीय व्यवस्था वाढवण्यावर भर

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य वन संरक्षक रामानुजम, क्षेत्र संचालक शुक्ला, उपवनसंरक्षक वाघाये,उपवनसंरक्षक तलमले, वनविकास महामंडळाच्या दिव्या भारती आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत वन्यप्राणी हल्ल्यांनंतर तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी कृषी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन नागरिकांशी संवाद साधावा, असेही आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत समाविष्ट गावांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासोबतच मंजूर व प्रस्तावित कामांची माहिती गावांमध्ये दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच वन्यप्राणी-मानव संघर्ष कमी करण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आ.मुनगंटीवार यांनी भर दिला.

पोंभुर्णा व चंद्रपूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रांतील गावांच्या पुनर्रचनेसाठी बीट गार्डची संख्या वाढविणे, नवीन आकृतीबंध तयार करणे तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.तसेच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा देशातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे का, याचीही त्यांनी विचारणा केली. परिसरातील वीजपुरवठ्याबाबत महावितरणकडून सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देत, कॅम्प संदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षांतील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मानव मृत्यूंचा सविस्तर आढावा घेतला. तसेच मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली व त्याबाबत आवश्यक निर्देशही दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *