मुलच्या दळणवळण सुविधांना मिळणार नवी बळकटी; मंजूर एसटी बस आगार कार्यान्वित करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

मुल येथे चार एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न; बस आगाराच्या उभारणीसाठी १४.९९ कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

प्रस्तावित कामासाठी उर्वरित निधी आमदार निधीतून देण्याची आ.मुनगंटीवार यांची ग्वाही; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

चंद्रपूर – मुल शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांना अधिक बळकटी मिळावी आणि मंजूर एसटी बस आगार लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. बस आगाराच्या प्रत्यक्ष उभारणीतील अडचणी दूर करून कामाला गती देण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी बस आगारासाठी शहराच्या जवळ आणि प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य अशी चार एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली. तसेच उभारणीसाठी १४.९९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या वतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रस्तावित कामासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याची तयारीही आ.मुनगंटीवार यांनी दर्शविली. त्यामुळे मुलच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय नियंत्रक चंद्रपूर ,प्रादेशिक अभियंता श्री. दिनेश महाजन , श्री. गिरीश देशमुख (वित्तीय सल्लागार), श्री. नितीन माईंद यांच्यासह परिवहन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

मुल येथे यापूर्वीच मंजूर झालेल्या एसटी बस आगाराचे काम प्रत्यक्ष सुरू होऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, या उद्देशाने आयोजित बैठकीत आगाराच्या उभारणीतील विविध अडचणी, जागेची उपलब्धता आणि निधीच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. बस आगारासाठी शहराच्या जवळ आणि प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची अशी चार एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. तसेच बस आगाराच्या उभारणीसाठी १४.९९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या वतीने सादर करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले.

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मुलच्या विकासासाठी निधीची कमतरता आड येऊ देणार नाही, ही भूमिका स्पष्ट करत प्रस्तावित कामासाठी आवश्यक असलेला उर्वरित निधी आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देऊन सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात आणि मंजूर बस आगाराच्या उभारणीचे काम वेगाने मार्गी लावावे, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी बैठकीत दिल्या.

सक्षम सार्वजनिक वाहतुकीतून प्रवाशांना मिळणार दिलासा

मुल येथे एसटी बस आगार कार्यान्वित झाल्यानंतर बससेवेचे नियोजन अधिक सुलभ होण्यास आणि मुल शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची अधिक चांगली सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. विशेषतः शिक्षण, रोजगार, आरोग्यविषयक गरजा आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळू शकेल. ग्रामीण भागातील गावांना मुल शहराशी आणि पुढे अन्य महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यामुळे अधिक बळकटी मिळेल.

विकासकामांतून बदलले मुलचे रूप; विकासाचा व्यापक पट

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मुल तालुक्याच्या विकासाला विविध क्षेत्रांत नवी दिशा मिळाली आहे. मुल शहरातील मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची इमारत, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टँक आणि आठवडी बाजार अशा विविध विकासकामांनी शहराच्या नागरी सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर घातली आहे. यासोबतच आरोग्य क्षेत्रात १०० खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. मुल येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाला मान्यता मिळाली असून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शूरवी महाविद्यालयही सुरू आहे. रस्ते, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात झालेली ही कामे मुल तालुक्याच्या बदलत्या विकासचित्राची साक्ष देतात. आ.मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुल तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *