चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात भाजपच्या दोन महिला नेत्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. मे महिन्यात स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याच महिलेकडून तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची विक्री करण्याची तयारी सुरू असतानाच रामनगर पोलिसांनी तिला अटक केली होती.
या प्रकरणामागे ‘लिव्ह इन’ आणि अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे का, याचा तपास पोलीस करत होते. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन महिला नेत्यांची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे निष्पन्न झाल्याने आज त्यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तपासाच्या गोपनीयतेमुळे रामनगर पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही महिला नेत्यांची नावे जाहीर करण्याचे टाळले आहे. या बाळ विक्री प्रकरणात आतापर्यंत १५ वर्षीय पीडित मुलीवर अत्याचार करणारा प्रियकर अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई आणि बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
