नान्होरी येथे सभा मंडपाचे उद्घाटन, रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
समाजात मानवता, सेवाभाव आणि सामाजिक एकतेची मूल्ये रुजविण्यासाठी लोकपयोगी, सामाजिक उपक्रमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. रक्तदानातून एखाद्याला जीवनदान देण्याचे महान कार्य घडते, तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून नव्या पिढीला शिक्षण आणि प्रगतीची प्रेरणा मिळते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमधून समाजात माणुसकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी येथे महान त्यागी बाबा जुमदेवजी बहुउद्देशीय सेवक संस्थेच्या वतीने आयोजित जनरल हवन कार्य, नवीन सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा, रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, महान त्यागी बाबा जुमदेवजी बहुउद्देशीय सेवक संस्थेचे अध्यक्ष अनिल नवघडे, कोषाध्यक्ष मारुती नाकतोडे, सुषमा उईके, कपिल राऊत, अमोल पेशने, प्रभाकर शेंडे, शेखर तलमले, सुधाकर तलमले, प्रमोद बोरकुटे, नवजीवन जांभुळे, होमदेव चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, सत्य, मर्यादा, प्रेम आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने भेदभाव बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. रक्तदानासारख्या उपक्रमातून गरजू रुग्णांना नवजीवन मिळते, तर विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळते आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवक उपस्थित होते.
