चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा भिमणी नदीत मृतावस्थेत आढळलेला वाघ वनपथक पोचण्याआधीच गेला वाहून

वनविभागात खळबळ, वनाधिकारी प्रकरणावर मौन

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी नदी पात्रात वाघ मृतावस्थेत दिसून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाघाचा मृतदेह मुसळधार पावसाच्या सोबत नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सध्या वनविभागाने मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत.

शेतकरी व मजूर शेतातील कामे आटोपून परतत असताना त्यांना भीमणी नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगणारा वाघ मृतावस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाकडून ग्रामस्थांनाही मृतदेह दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाघांच्या मृत्यूच्या मालिकेत ही नवी भर पडल्याने वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वरीष्ठ वनाधिकारी मात्र प्रकरणावर मौन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *