चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (DIL), पहेल मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर आणि ग्रामपंचायत ताडाळी यांच्या संयुक्त विद्यमाने ताडाळी येथील ध्यान साधना केंद्रात नि:शुक भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच त्वचा रोग तपासणी करून नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. हा उपक्रम धारीवाल कंपनीचे मुख्य महाप्रबंधक देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिश नायर, ताडाळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. निखिलेश चामरे, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे श्री. प्रतिक वानखेडे, श्री. रवि चावरे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी पडलमवार, डॉ. ज्ञानेश्वर लांडगे, गणपती ऑप्टिकल्सचे श्री. सुदर्शन झुंजारवार तसेच प्रकल्प प्रभारी सौ. अल्का पनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक ब्रैंडन डिसूजा यांनी केले.
शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी मध्ये एकूण 106 नागरिक, डोळ्यांची तपासणी दृष्टीविषयक मार्गदर्शन मध्ये एकूण 184 नागरिक तसेच त्वचा विकारांची तपासणी करून आवश्यक उपचार व आरोग्यविषयक सल्ला 77 नागरिकांनी देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चंदन मासरकर, बालसखी माधवी इलमकर, विकासगंगा समाजसेवी संस्था, कलकत्ता फाउंडेशन तसेच सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील बी.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले व शिबिराचे नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय योगदान दिले.
शिबिराचा लाभ ताडाळी व परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला. उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले. शेवटी सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि उपस्थित नागरिकांचे आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले.
