गणेशोत्सवात 32646 भाविक व नागरिकांची आरोग्य तपासणी

श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमांतर्गत 439 आरोग्य शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, दि. 22 : गणेशोत्सवाच्या उत्साहात बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचीही काळजी घेत मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा कक्षाच्या पुढाकाराने जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ हा विशेष आरोग्य उपक्रम 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून गणेशोत्सव हा केवळ भक्ती आणि उत्सवाचा सोहळा न राहता समाजहिताचा संदेश देणारा उपक्रम ठरत आहे. ‘बाप्पाचे दर्शन, सोबत आरोग्याची काळजी’ या संकल्पनेतून गणेशभक्त आणि परिसरातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात येत आहे.

439 शिबिरांत 32 हजार 646 नागरिकांची तपासणी
14 सप्टेंबरपासून आतापर्यंत जिल्ह्यात 439 ‘श्री गणेशा आरोग्याचा’ शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण 32 हजार 646 भाविक व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 13 हजार 193 पुरुष, 16 हजार 284 महिला आणि 3 हजार 169 बालकांचा समावेश आहे.

विविध आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि नागरिकांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन मिळावे, यासाठी शिबिरांमध्ये विविध तज्ज्ञ विभागांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत हृदयरोग विभागांतर्गत 119, मेडिसिन 16 हजार 184, शस्त्रक्रिया 79, अस्थिरोग 1 हजार 225, बालरोग 2 हजार 198, स्त्रीरोग 1 हजार 101, कान-नाक-घसा 425, नेत्ररोग 514, त्वचारोग 1 हजार 77 आणि इतर प्रकारच्या 2 हजार 679 तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यासोबतच 4 हजार 434 रक्त तपासण्या, 252 ईसीजी आणि 66 अँजिओग्राफी करण्यात आल्या आहेत. शिबिरांच्या माध्यमातून 2 हजार 438 आयुष्मान/आभा कार्ड तसेच 346 गोल्डन कार्ड संदर्भातील कार्यवाही करण्यात आली. रक्तदान उपक्रमांतर्गत 224 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.

विविध आरोग्य यंत्रणांचा सहभाग
जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरी आरोग्य अभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय सहाय्यक आयुक्त कार्यालय, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तसेच जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सहकार्य लाभत आहे.

जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या जिल्हा कक्षामार्फत हा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे सुरू आहेत.

‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमाचा लाभ घ्यावा
गणेशोत्सवाच्या आनंदासोबत नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. 25 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कविश्वरी कुंभलकर, वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्ष यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *