ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यण कामगार संघटनेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

दिवंगत कामगार भानुदास मारोती उकिणकार यांच्या कुटुंबीयांना ८४ हजार ३०० रुपयांची आर्थिक मदत

ताडाळी, चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या वतीने गोपाणी येथील कामगार भानुदास मारोती उकिणकार, रा. सोनेगाव, यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी ८४ हजार ३०० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. दुःखाच्या प्रसंगी दिवंगत कामगाराच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहून संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. कामगार हा केवळ औद्योगिक व्यवस्थेचा एक घटक नसून तो आपल्या कुटुंबाचा आधार असतो. अशा वेळी एखाद्या कामगाराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. ही जाणीव ठेवून संघटनेच्या वतीने दिवंगत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.

कामगारांच्या हक्कांसाठी लढा देण्याबरोबरच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, संकटाच्या काळात त्यांना आधार देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे, ही भूमिका ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यण कामगार संघटना सातत्याने जपण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमातून संघटनेतील एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे, उपाध्यक्ष श्री. मोहन वाघमारे, महासचिव श्री. संतोष बांदुरकर, कार्याध्यक्ष श्री. तुळशिराम डेरकर, कोषाध्यक्ष श्री. सदाशीव चतुर, सहकोषाध्यक्ष श्री. दशरथ रोगे, तसेच श्री. विजय मोरे, श्री. नंदू टोंगे, श्री. सागर कन्नीरवार, श्री. विकास आवारी, श्री. संतोष खोब्रागडे आणि श्री. महेश जुनघरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

कामगारांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या या उपक्रमामुळे ताडाळी एमआयडीसी स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *