सेवा संकल्प अभियानात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर, दि. 02 : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाच्या माध्यमातून कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 8 वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जिवने, प्रशासकीय अधिकारी संदेश चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित प्रेमचंद, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. शरद कुचेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय कार्यालये व संस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासोबतच स्वच्छतेची सवय आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील विविध भागांची सामूहिक श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी, परिचर्या संवर्गातील अधिकारी- कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, स्मार्ट सर्व्हिसेसचे कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रुग्णालयासारख्या सार्वजनिक आरोग्य संस्थेत स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता दैनंदिन कार्यसंस्कृतीचा भाग व्हावी, या संदेशासह परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
