राज्याच्या इतिहासातली मानव -वन्यजीव संघर्षातील सर्वात मोठी घटना, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू ,तेंदूपाने तोडण्यासाठी

जंगलात गेलेल्या महिलांच्या एका गटावर वाघाचा हल्ला, सर्व महिला घरच्या एकमेव कर्त्या असल्याने गावात तणावाची स्थिती, पोलीस व वनपथक हाताळत आहे परिस्थिती

 राज्याच्या इतिहासात मानव- वन्यजीव संघर्षात एकाच घटनेत सर्वाधिक चार मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही जंगलात उघडकीस आली. तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामीण भागातील नागरिकांची जंगलावरची अवलंबिता आणि वाघ वन्यजीव हल्ल्याची भीषणता प्रकर्षाने पुढे आली आहे

 चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज वाघ हल्ल्याच्या घटनेने हादरला. जंगलात तेंदू पाने तोडण्यासाठी गेलेल्या

कवडूबाई दादाजी मोहुर्ले-45,
अनुबाई दादाजी मोहुर्ले-46,
संगीता संतोष चौधरी-36,
सुनीता कौशिक मोहुर्ले-33

गुंजेवाही गावातील रहिवासी या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू दाखल झाली आणि पंचनामा करून मृतदेह सिंदेवाही येथे रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना सांगताना सोबतच्या महिला देखील थरथरत होत्या.

प्रत्यक्षदर्शी

चंद्रपूरसह विदर्भाच्या जंगलांमध्ये तेंदूपाने अर्थात बिडी वळण्यासाठी आवश्यक असलेली पाने तोडण्याचा हंगाम वन विभाग जाहीर करते. यंदा अनेक शासकीय अडथळ्यानंतर हा हंगाम नुकताच जाहीर झाला. ग्रामीण भागातील गरीब घटकातील कुटुंबांना हा संपूर्ण वर्षासाठी पुरणारा आर्थिक स्त्रोत आहे. म्हणून जिल्ह्यातील खेडेगावातील कुटुंबेच्या कुटुंबे सकाळी चार वाजेपासून नेमलेल्या भागात पाने तोडणीसाठी जातात. ठेकेदार आणि वनखाते मिळून त्यांना यासाठी रक्कम देत असतात. गेली काही वर्षे मानव -वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत आहेत म्हणूनच वनविभागाने संघर्षग्रस्त भागातील काही क्षेत्रात तेंदूपाने तोडणी थांबवली आहे. मागील वर्षी याच तालुक्यातील मेंढा माल जंगलात अशाच पद्धतीने पाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला होता. यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेनंतर वनविभागाने या भागात कॅमेरा ट्रॅप लावून वाघ जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मयत झालेल्या महिला आपल्या घरच्या एकमेव कर्त्या होत्या. कौटुंबिक कारणांनी त्यांना आपले घर मोलमजुरी करून चालवावे लागत होते. यातील सुनिता मोहूर्ले यांना दोन लहान मुली आहेत तर पतीचे आधीच निधन झाले आहे. मयतांमधील कवडूबाई आणि अनुबाई या दोन सख्ख्या बहिणी होत्या. आज या गावामध्ये घटनेनंतर आक्रोश आहे. गेल्या काही महिन्यात या भागात वन्यजीव हल्ल्यात 7 मृत्यू झाले आहेत. तर जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्षात 2026 या वर्षात 19 मृत्यू झाले आहेत. या भागात मानव- वन्यजीव संघर्षाची स्थिती भयावह असताना मंत्री- अधिकारी कुणीही येऊन विचारपूस करत नाही. त्यामुळे आता उपाययोजना करा अन्यथा घटना झाल्यास कायदा हातात घेऊ असा थेट इशाराच या भागातील नागरिकांनी दिला आहे

 

वाघ वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यास मयताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने एक संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. हे हल्ले आता नित्याची बाब झाली असल्याने ग्रामीण चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील स्थिती दहशतीची झाली आहे. यावर एकत्रित उपाययोजना न केल्यास स्थिती चिंताजनक होत जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *