पाणी बचत व जलसंवर्धनाचा नागरिकांना संदेश
चंद्रपूर, दि. 03 : जलसंपदा विभागाच्या वतीने दि. 2 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘जल सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ जलदिंडीच्या माध्यमातून करण्यात आला. या जलदिंडीतून जलसंवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने व कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला.
दीना विश्रामगृह, चंद्रपूर येथून जलदिंडीला प्रारंभ झाला. जटपुरा गेट, गांधी चौकमार्गे ही दिंडी पुन्हा विश्रामगृह येथे पोहोचली. जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असून, सध्या धरणांमध्ये सुमारे 70 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. ‘प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे; उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीने वापरूया’, असा संदेश जलदिंडीच्या माध्यमातून देण्यात आला.
अभियानाच्या कालावधीत जलकर वसुली व तक्रार निवारण, शेतकरी आणि पाणी वापर संस्थांशी संवाद, जलजागृती, कालवा स्वच्छतेसाठी श्रमदान, कालवे व वितरण प्रणालीची पाहणी, प्रकल्पबाधित व पुनर्वसन गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे तसेच भूसंपादनाची कामे गतिमान करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचा विवेकपूर्ण व कार्यक्षम वापर आणि जलव्यवस्थापनामध्ये शेतकरी व नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
जलदिंडीत चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंग, उपकार्यकारी अभियंता नरासपुरे, पुल्लावर व कांबळे, तसेच चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळातील उपविभागीय अभियंते जामगडे, यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा आणि उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करा’, हा संदेश अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
000000
