मुंबई : वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमधल्या यूथ वनडे सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली. यानंतर त्याने यूथ टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात अर्धशतकही झळकावले. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही वैभवने चांगली सुरूवात केली. वैभव टेस्ट क्रिकेटमध्येही टी-20 स्टाईलने बॅटिंग करत होता, पण आपल्या बॅटिंगची जादू दाखवण्यापूर्वीच त्याला पॅव्हेलियनमध्ये परत जावं लागलं. या सामन्यात वैभवकडून मोठी खेळी अपेक्षित होती, पण पहिल्या डावात त्याने निराशा केली.
चेम्सफोर्ड येथे दुसऱ्या यूथ टेस्टमध्ये भारत अंडर-19 आणि इंग्लंड अंडर-19 च्या टीम आमनेसामने येत आहेत. या सामन्यात इंग्लंडने पहिले बॅटिंग करत 309 रन केल्या. एकांश सिंगने 155 बॉलमध्ये 117 रनची खेळी खेळली. यानंतर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. वैभवने पहिल्याच बॉलपासून इंग्लंडच्या बॉलिंगवर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्याने 14 बॉलमध्ये 20 रन केल्या ज्यामध्ये दोन सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. वैभवने फास्ट बॉलर अॅलेक्स ग्रीनला लक्ष्य केले. त्याने भारतीय इनिंगच्या सहाव्या ओव्हरमधील पहिला बॉल सिक्स मारला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात वैभव आऊट झाला.
